या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा ; येलो अलर्ट जारी
राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. कधी कडक उन्हाचा तडाखा तर कधी अचानक पावसाच्या सरी अशी स्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यातच अनेक भागांत अवकाळी पाऊस कोसळत असल्याने उकाड्यापासून नागरीकांना दिलासा मिळत आहे. मात्र शेतकरी चिंतेत आहेत. भारतीय हवामान विभागाने २० मार्चपर्यंत राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याच्या माहितीनुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडत असून पिकांचे संरक्षण करण्यासाठी धावपळ सुरू आहे.


गेल्या २४ तासांत अकोला येथे देशातील सर्वाधिक ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील तापमानात किंचित घट झाली असून रविवारी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हवामान विभागाने १७ मार्चपासून जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
या कालावधीत काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.