चोपड्यात विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर छापा ; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

0

जळगाव । चोपडा तालुक्यातील मौजे वैजापूर येथील मे. न्यू लक्ष्मी कृषी केंद्र या विनापरवाना सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्रावर जिल्हा स्तरावरील भरारी पथकाने छापा टाकत सुमारे 7.35 लाख रुपये किंमतीचा अनधिकृत बियाणे आणि रासायनिक खत साठा जप्त केला.

न्यू लक्ष्मी कृषी केंद्राचे प्रोप्रायटर श्री. योगीराज देवसिंग पाटील (वय 30, रा. नागलवाडी) हे 25 मे 2025 पासून शासनाची कोणतीही परवानगी न घेता बियाणे आणि खते विक्री करत असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे 20 टन (405 गोण्या) रासायनिक खत (किंमत ₹4,52,446/-) आणि मका व कापूस पिकांच्या 188 बियाण्यांच्या पॅकेट्स (किंमत ₹2,83,418/-) असे एकूण ₹7,35,864/- किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. संबंधित साठ्यास विक्री बंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी श्री. विकास बोरसे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात बियाणे कायदा 1966, बियाणे नियंत्रण आदेश 1983, खत नियंत्रण आदेश 1985 व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संयुक्त कारवाई अविनाश खैरनार, मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव; किरण पाटील, कृषी अधिकारी, पंचायत समिती चोपडा; रामचंद्र पाटील, मंडळ कृषी अधिकारी हातेड (ता. चोपडा) यांच्या पथकाने केली.

ही कारवाई जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, संचालक (गु.नि.) श्री. सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. कुरबान तडवी व कृषि विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.