राहुल गांधींना भिवंडी न्यायालयाचा मोठा दिलासा ! नेमकं काय घडलं?

0

मुंबई । आरएसएसबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला असून याप्रकरणी त्यांनी आज भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी यांचे आधीचे जामीनदार आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकोरकर यांचे निधन झाल्यामुळे त्यांचा जामीन रद्द झाला होता. आज पुन्हा नव्याने जामीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

भिवंडी न्यायालयात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात खटला सुरू आहे. राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी यांनी भिवंडीतील सोनाळे गावात प्रचार सभा घेतली होती. या सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान राहुल यांनी केल्याचा आरोप आहे. राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याने संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत त्यांनी भारतीय दंड संहिता कलम ५०० अन्वये खासगी फिर्याद न्यायालयात खटला दाखल केला होता.

या प्रकरणात फिर्यादीची सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस अधिकारी सायकर यांचीही सरतपासणी नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना माजी केंद्रीय गृह मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी जामीन दिला होता. काही महिन्यांपूर्वी शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. त्यामुळे राहुल यांना नवीन जामीन देणे आवश्यक होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांना जामीन दिला. न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्या न्यायालयात ही प्रक्रिया पार पडली. त्यानंतर न्यायाधीशांनी राहुल गांधींना जामीन मंजूर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.