शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान! राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस
मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. संजय गायकवाड यांच्या या विधानावरुन शिंदेंच्या आमदारांवर काही वचक आहे की नाही? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.
नुकतेच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य केलं होते. यावरूनच संजय गायकवाड वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “राहुल गांधी यांना मागासवर्गीय आदिवासी सह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला, असे म्हणत जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार,” असे धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले.
तसेच “जेव्हा महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाची मागणी पेटली होती, तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी देशात आरक्षण संपवण्याचे विधाने केले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फेक नेरेटिव्ह सेट करुन मते घेतली. आज त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. काँग्रेसचा चेहरा अन् मळमळ त्यांनी बोलून दाखवली. त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. माझं आव्हान आहे, जो राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस माझ्या वतीने देईल,” असे संजय गायकवाड म्हणालेत.