पिंपरी-चिंचवड । पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असलेल्या नकुल भोईर यांची हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीने नकुल भोईर याना संपविले आहे. आरोपी पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली.
ही घटना माणिक कॉलनीतील महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाच्या इमारतीत घडली. पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होते. मयत नकुल भोईर हे पत्नी चैतालीवर चारित्र्याच्या संशयातून वारंवार वाद घालत होते. या वादातूनच चैताली हिने रागाच्या भरात नकुल भोईर यांचा कापडाने गळा आवळून खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.


मयत नकुल भोईर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच, ते सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र म्हणून परिचित होते. नकुल भोईर आणि चैताली भोईर हे दोघेही आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तो मेसेज ठरला अखेरचा..
येत्या महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चैताली भोईर यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यासाठी उपक्रम व कार्यक्रम देखील नकुल भोईर यांनी घेतले होते. त्याचप्रमाणे नकुल भोईर हे सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह होते. दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावरती शुभेच्छाची पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट अखेरची ठरली.