जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत उद्योजकांची चर्चा
जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रम योजना (PMFME) अंतर्गत कार्यरत जिल्हा संसाधन व्यक्ती आणि विविध उद्योजकांशी सविस्तर बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्याचा आर्थिक पट अधिक भक्कम करण्यासाठी स्थानिक स्तरावर उत्पादनक्षम आणि निर्यातक्षम उद्योजक घडविण्याचे महत्त्व विशद केले.
या संवाद बैठकीत जळगाव जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित उद्योजकांनी आपले अनुभव, अडचणी व गरजा मांडल्या. काही उद्योजकांनी वित्तपुरवठा न होणे, परवाने व शासकीय मंजुरी प्रक्रियेतील विलंब, उत्पादनांना बाजारपेठ मिळवण्यात येणाऱ्या अडचणी तसेच ब्रँडिंगसाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाचा अभाव अशा विविध मुद्द्यांवर भर दिला.
जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनी या सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांना समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्याचा विकास कृषी प्रक्रिया, सौर ऊर्जा, वस्त्रोद्योग आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून शक्य आहे. PMFME योजनेद्वारे सूक्ष्म व लघुउद्योगांना चालना देत हजारो उद्योजकांना नवसंजीवनी देता येईल.
“PMFME ही योजना म्हणजे ग्रामीण व अर्ध-शहरी भागातील उद्योजकांसाठी मोठे संधीचं व्यासपीठ आहे. योग्य मार्गदर्शन, भांडवली सहाय्य आणि तांत्रिक प्रशिक्षण मिळाल्यास हे उद्योजक जागतिक स्तरावर पोहोचू शकतात. आणि त्यातूनच आपल्या जिल्ह्याची अर्थव्यवस्था २५ अब्ज डॉलर्सच्या दिशेने प्रगती करू शकते,” असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्टपणे नमूद केले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, योजना समन्वयक, बँकिंग क्षेत्रातील प्रतिनिधी, तसेच यशस्वी उद्योजक उपस्थित होते. बैठकीमध्ये स्थानिक उत्पादनांची मूल्यसाखळी अधिक मजबूत करण्यासाठीच्या धोरणांवरही चर्चा झाली.
योजना अंमलबजावणीत सहभागी प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची असून, सर्व संबंधितांनी एकत्रितपणे कार्य केले तर जळगाव जिल्ह्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे सहज शक्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला.