काँग्रेसला जोरदार धक्का! आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर?
मुंबई । राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली असून हिंगोलीत भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय.काँग्रेसचे स्वर्गीय नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
उद्या म्हणजेच १८ डिसेंबर रोजी त्या आपल्या हाती कमळ घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी भाजपकडून मोठ्या हालचाली सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती आहे. हिंगोलीच्या स्थानिक राजकारणात सातव कुटुंबाचा दबदबा राहिलेला आहे. काँग्रेसचे मोठं नाव म्हणून राजीव सातव यांच्याकडे पाहिले जात होते; पण कोव्हिड काळात सातव यांचे निधन झाले.


त्यांच्या पश्चात काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव झाल्या. नुकत्याच राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यातच प्रज्ञा सातव काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्या भाजपमध्ये जाणार असून, याबाबतची नेमकी माहिती समजू शकलेली नाही.