निवडणूक प्रचाराची वेळ वाढवली; राज्य निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

0

मुंबई । महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा राजकीय माहोल तापलेला असताना, राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या मुदतीत फेरबदल करत सर्व उमेदवारांना, विशेषतः अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली आहे. २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी आता १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. यापूर्वी ३० नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस सांगण्यात आला होता. पण आता उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरपरिषद आणि नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता १ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराचा कालावधी वाढवला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नगरपरिषद आणि नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार आहे. तर प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावा.

अपक्ष उमेदवारांना कमी दिवसांचा प्रचाराचा वेळ मिळाला होता. चिन्ह वाटप सुद्धा उशिरा झाले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने अपक्ष उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने पक्षांना आणि उमेदवारांना दिले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.