पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन

0

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि.17 सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्ताने दि.17 सप्टेंबर, 2024 ते दि.17 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत राज्यभर “मोदी सेवा महिना” राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमअंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, ग्रामविकास विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, निरामय सेवा फाऊंडेशन, धर्मादाय रुग्णालये, धर्मादाय संस्था, मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व लोक सहभागातून हे आरोग्य शिबरे पार पडणार आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये, वाड्यावस्त्यांवर 25 हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. सुमारे 40 लाख नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याचे ध्येय निर्धारीत केले आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत या शिबिरांचे आयोजन होणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.शिबिरांमध्ये रुग्ण तपासणीसोबतच 59 प्रकारच्या रक्त चाचण्या, ई.सी.जी. या सारख्या तपासण्याही केल्या जाणार असून आवश्यक औषधांचे वाटप केले जाणार आहे. त्यासोबतच आयुष्मान भारत योजना- ‘आभा कार्ड’चे वाटप केले जाणार आहे.

रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. यासाठी उप मुख्यमंत्री कार्यालयांतर्गत ‘राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष’ समन्वय साधणार आहे.या कक्षाच्या माध्यमातून गोर-गरीब रुग्णांना होणाऱ्या वैद्यकीय सहाय्याचा आलेख दिवसें-दिवस चढता राहिला आहे. अवघ्या 8 महिन्यांत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना 13 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली गेली. यामुळे राज्यातील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला.

उपमुख्यमंत्री विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून हृदय रोग, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण सारख्या गंभीर व सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेरील आजारांवर धर्मादाय रुग्णांलयात उपचार होत आहेत. निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी विशेष वैद्यकीय मदत कक्ष तत्परपणे कार्य करत आहे.प्रत्येक धर्मादाय रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा निर्धन रूग्णांवर मोफत उपचारासाठी व 10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोफत व सवलतीच्या दरात जास्तीत जास्त गरजुंना उपचार घेता यावेत यासाठी आपण वार्षिक उत्पन्न मर्यादा देखील वाढवली आहे. निर्धनांसाठी ती 1 लाख 80 हजार रुपये तर दुर्बल घटकांसाठी ३ लाख ६० हजार रुपये एवढी वाढवली आहे. त्यामुळे कुणीही निर्धन व दुर्बल घटकातील रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही.

मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळवण्याकरीता अधिक माहितीसाठी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर तसेच 022-22020045 या दुरध्वनीवर संपर्क साधता येईल, असे आवाहनही उपमुख्यमंत्री, श्री.देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.