अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक ; विधान भवनाच्या पायऱ्यावरच नारेबाजी; बावनकुळेंना घातली टोपी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवार ३० जून २०२५) पासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतले. यावेळी विरोधी पक्षाचे अनेक नेते हे विधानभवनाच्या पायऱ्यांवर मी मराठी ही टोपी घालून बसले होते.
विधानभवनाच्या सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार ‘मी मराठी’ टोपी घालून दाखल झाले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मी मराठी असे लिहिलेली टोपी घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर आदित्य ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात हस्तांदोलनही झाले. तसेच भास्कर जाधव आणि अजय चौधरी हे देखील मी मराठी असे लिहिलेली टोपी घालून उपस्थित होते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश पटलावर ठेवला जाणार
तर दुसरीकडे विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय करून दिला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश पटलावर ठेवला जाणार आहे. तसेच २०२५-२६ च्या पुरवणी मागण्याही सादर केल्या जातील. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर आजचे कामकाज संपणार आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील थोड्याच वेळात विधानभवनात पोहोचतील. दुपारी २ वाजता ते आझाद मैदान येथे जाणार असून, त्यानंतर तीन वाजता सिल्वर ओक येथे देखील उपस्थित राहतील. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे यंदाचे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
विरोधक या मुद्यांवरुन सरकारला घेणार
शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजणार
लाडकी बहीण योजनेवरुन जोरदार खडाजंगी होणार
पुण्यातील हुंडाबळी ठरलेली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
मे, जून महिन्यातील पावसाचा मुंबई, पुण्यातील जनजीवनाला बसलेला फटका
पुण्यात तळेगाव जवळच्या इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू
इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा सुरू असलेला गोंधळ
संदिपान भूमरे यांच्या चालकाकडील संपत्तीचा मुद्दा