पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत यावल तालुक्यातील तरुण बुडाला
जळगाव । यावल तालुक्यातील न्हावी येथील १८ वर्षीय दर्शन नारायण कोलते या तरुणाचा पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शोकाकुल वातावरणात आज दर्पणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत असे की, यावल तालुक्यातील न्हावी गावचा रहिवासी दर्शन कोलते व त्याचा मित्र मनोज रघुनाथ कापडे (वय १८,रा. न्हावी ता. यावल) हे पंढरपूरला विठ्ठल दर्शन घेण्यासाठी गेले होते. पंढरपूरमध्ये पोह्चल्यानंतर दर्शन आणि त्याचा मित्र चंद्रभागा नदी पात्रात स्नानासाठी गेले होते. येथील भक्त पुंडलिक मंदिरजवळ ते नदीत उतरले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने दर्शन व त्याचा मित्र दोघे बुडाले. दोघेजण बुडत असल्याचे नदीत असलेल्या भाविकांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी लागलीच मदत करत मनोज कापडे याला बाहेर काढत वाचवले. मात्र दर्शन कोलते याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह आठ तासांनी हाती लागला. आज, सोमवार सकाळी आठ वाजता दर्पणचा मृतदेह न्हावी गावात आणण्यात आला आणि शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्पण कोलते हा गरीब कुटुंबातील विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आणि आपल्या दोन मुलांचे शिक्षण सांभाळत होते. दर्पणच्या लहान भावाने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे, तर मोठा भाऊ औरंगाबाद येथे पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. अशा कठीण परिस्थितीत या तरुण विद्यार्थ्याचा अकाली मृत्यू झाल्याने न्हावी गावात सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरले आहे.