पाळधीत नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले, दगडफेक व जाळपोळ करणाऱ्यांचा शोध सुरु
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक व जाळपोळीची घटना घडली असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली.
वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक हे धावून गेल्याने दोन गट आमने सामने आली आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू होता.