महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ –पाळधीत ‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

बचत गट हे केवळ बचतीचे नव्हे तर समाजपरिवर्तनाचे शक्तिकेंद्र

जळगाव । “जिथे स्त्री सक्षम आहे, तिथे कुटुंब समृद्ध असतं आणि जिथे कुटुंब समृद्ध आहे तिथे समाज उन्नत होतो. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग स्वीकारला, हेच खरं सशक्तीकरण आहे, आणि त्या सशक्ततेचं प्रतीक म्हणजे ‘बहिणाई मार्ट’,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.

पाळधी-बांभोरी परिसरातील स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाई मार्ट’ या उपक्रमाचं भूमिपूजन पार पडलं. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या वेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. गावागावातल्या घराघरातून उद्योजिका तयार होतील, ही आमची पूर्ण खात्री असून पाळधीच्या मातीतून आता बचत गटांचा स्वतःचा ब्रँड निर्माण व्हावा, उत्पादनातून ओळख तयार व्हावी, महिलांना थेट बाजारपेठ मिळावी हीच आमची अपेक्षा आहे. महिला बचत गटांचे वेळेत कर्जफेडीमुळे बचत गटांचा बँकांमधील विश्वास वाढलेला असून त्यांची बँकांमध्ये पत वाढलेली आहे. आज बचत गट हे केवळ महिलांचे बचतीचे माध्यम राहिले नसून, समाज बदलवण्याचे शक्तिकेंद्र बनले आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी,स्त्री शक्ती हेच खऱ्या अर्थाने बचत गटांचं सामर्थ्य आहे. महिलांना बचतीचे महत्व असून जिद्दीने व्यवसाय वाढवावा, प्रशासनाच्या दृष्टीने बचत गट हे अत्यंत विश्वासू घटक आहेत” असे मत व्यक्त केले.

प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ३० हजार बचत गटांना आतापर्यंत ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले असून, आगामी काळात दरवर्षी ८०० ते १,००० कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट आहे. माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी ग्रामसंघाच्या कार्यालयासाठी सहकार्य देण्याची ग्वाही दिली. आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक अरुण पवार यांनी आदिवासी महिलांसाठीच्या योजनांची माहिती देत त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शक्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा उषाबाई पाटील होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलन व स्वागतगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक किरण महाजन यांनी केलं. सूत्रसंचालन कृषी सखी आशा पाटील आणि सुवर्णा साळुंखे यांनी, तर आभार प्रदर्शन पुनम पाटील यांनी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.