धक्कादायक ! टँकरखाली चिरडून १५ वर्षीय बालक ठार, पाचोरा तालुक्यातील घटना
पाचोरा : भरधाव टँकरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका घडली. या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते.
राजवीर नरेंद्र भोसले असं अपघातात मरण पावलेल्या बालकाचे नाव असून त्याचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दि. १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकर खाली येऊन चिरडून ठार झाला आहे. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.