एका चुकीने विद्यार्थिनीचं आयुष्य संपलं, पेनाचं टोपण श्वसननलिकेत अडकलं, अन्…
धुळे । धुळे तालुक्यातील निमखेडी गावातील जिल्हा परिषद शाळेतून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे पेनाचं टोपण श्वसननलिकेत अडकल्याने सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्चना खैरनार असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव असून तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील निमखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीच्या श्वसननलिकेत टोपण अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्चना खैरनारचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या शाळेसहित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शाळेत अर्चना खैरनार हातात पेन घेऊन लिहित असताना तिने टोपण तोंडात टाकलं. त्यानंतर हे टोपण तिच्या श्वसननलिकेत अडकलं. यामुळे अर्चनाला असह्य त्रास होऊ लागला. तिच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी शासकीय रुग्णालयात विद्यार्थीनीला उपचारासाठी दाखल केले. परंतु श्वास गुदमरल्याने अर्चनाचा रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला.
शिक्षकाने काय सांगितलं?
आज जिल्हा परिषदेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने पेनाचं टोपन तोंडात टाकलं. पेणाचं हे टोपण तिच्या श्वसननलिकेत अडकलं. ही बाब लक्षात येताच वर्गशिक्षकांनी श्वसननलिकेत अडकलेलं टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या आजीला बोलावून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान अर्चनाचा मृत्यू झाला. आज तिचं दुर्दैवाने निधन झालं.