अमानुषतेचा कळस गाठणारी घटना ; वृद्धेची हत्या करून दागिने लांबविले
जळगाव । पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथे अमानुषतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. इथं ५ वर्षीय जनाबाई पाटील यांचा लोखंडी रॉडने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. मारेकऱ्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण तीन तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून पलायन केले. या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जनाबाई पाटील या शेवाळे येथील त्यांच्या मातीच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचा मुलगा कृष्णराव माहरु पाटील हे शेजारील दुमजली घरात राहतात. घटनेच्या दिवशी, गुरुवारी कृष्णराव पाटील हे त्यांच्या मित्राच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे गेले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर, त्यांना आपली आई झोपलेल्या ठिकाणी मृतावस्थेत आढळली. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून डोक्याचे दोन तुकडे केले होते. तसेच, गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची पोत आणि कानातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या बाळ्या ओरबाडून चोरट्यांनी वृद्ध महिलेला पलंगाखाली टाकून तिच्यावर अंथरूण पांघरूण टाकले होते.
या घटनेची माहिती मिळताच, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपाधीक्षक धनंजय वेरूळे, पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, प्रकाश पवार, एलसीबी टीम, फॉरेन्सिक लॅब टीम आणि डॉग स्क्वॉड तातडीने घटनास्थळी दाखल झाले. डॉग स्क्वॉडने गावातच सुगावा काढल्याने, वृद्ध महिलेचा मारेकरी हा गावातीलच असावा असा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.
या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णराव पाटील बाहेरगावी गेल्याची खबर लागल्याने रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पिंपळगाव हरेश्वर पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत असून, लवकरच आरोपी हाती लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शेवाळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.