जामनेर हादरले ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची हत्या
जामनेर । पती- पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणातून वाद निर्माण झाला. दोघांमधील हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीवर शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला बेड्या ठोकत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अनिता उर्फ मिनाताई बाळू मोरे वय ४५ रा. मुंदखेडा ता. जामनेर असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.
काय आहे घटना?


जामनेर तालुक्यातील मुंदखेडा गावात अनिता मोरे ह्या पती बाळू विश्वनाथ मोरे याच्या सोबत वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून बाळू मोरे आणि त्यांची पत्नी अनिता मोरे यांच्यात घरगुती वाद सुरू होता. गुरूवारी १८ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता दोघांचा वाद सुरू झाला, पत्नी घरी जाण्यास नकार देत होत. त्यामुळे हा वाद एवढा विकोपाला गेला की, बाळूने संतापाच्या भरात आपल्या पत्नीवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अनिता मोरे ह्या गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी तिला जखमी अवस्थेत तात्काळ जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी संशयित आरोपी बाळू मोरे याला अटक केली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.