जळगावात शिल्लक कारणावरून लॉन्ड्री व्यावसायिकाची हत्या

0

जळगाव । जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला रेल्वे अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक क्रूर हत्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

अमर सपकाळे (लॉन्ड्री व्यवसाय) असं हत्या झालेल्याचे नाव आहे. अमर यांचा मृतदेह खंडेराव नगर परिसरातील रेल्वे रुळाजवळ संशयास्पद स्थितीत सापडला होता. सुरुवातीला ही घटना रेल्वे अपघात म्हणून तपासली जात होती, मात्र रामानंदनगर पोलिसांनी तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात घेतले.

तपासादरम्यान एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या रात्री दोन संशयित रेल्वे रुळाजवळ सिगारेट पित बसले होते. त्याच वेळी अमर सपकाळे तेथे आले, जे मद्यधुंद अवस्थेत होते. काही कारणावरून वाद आणि शिवीगाळी झाल्यानंतर संशयितांनी संतापाच्या भरात सपकाळे यांचे डोक्यात मोठा दगड मारून त्यांची हत्या केली.

या प्रकरणात एक अल्पवयीन आरोपी ताब्यात असून, त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे. रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी पोलिसांकडून आरोपींवर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणात तत्काळ कारवाई करत असून फरार आरोपीच्या ताब्यातील शोधकार्य सुरू आहे. या घटनेने शहरात सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीत चिंता निर्माण केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.