मुक्ताईनगरमध्ये चाकूने भोसकून तरुणाची हत्या
जळगाव । मुक्ताईनगर शहरातील २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आलीय. विष्णू उर्फ विशाल गणेश गिर गोसावी असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेमागे प्रेम प्रकरण हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज डीवायएसपी सुभाष ढवळे यांनी वर्तवला.
मृत विष्णू गोसावी आणि त्याचे मित्र आकाश धनगर (वय २५) व ऋषिकेश धनगर (वय २३) हे शनिवारी शिरसाळा (ता. बोदवड) येथे मारुतीच्या दर्शनासाठी गेलेले होते. सायंकाळी परत आल्यानंतर ते मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावरील आर.आर. कॉलनी नावाच्या लेआउटमधील मोकळ्या जागी बसले. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले.


यादरम्यान आकाश व ऋषिकेशने चाकूने वार करत विशालचा खून केला. आकाश व ऋषिकेश हे दोघे भाऊ आहेत. घटनेनंतर ते पसार झाले. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने ठसे घेतले. मुक्ताईनगर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करणे सुरू होते. पोलिसांनी संशयित आकाश आणि ऋषिकेश याला ताब्यात घेतले.