तेरा वर्षीय तेजस महाजनचा निर्घृण खून; गळा चिरलेला मृतदेह शेतात आढळला

0

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातून एक खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. रिंगणगाव येथून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय तेजस गजानन महाजन याचा गळा चिरलेला मृतदेह मंगळवारी (दि.17) सकाळी खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तेजस महाजन (वय 13) हा आई-वडील आणि मोठ्या बहिणीसह रिंगणगाव येथे राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन हे शेती व हार्डवेअर दुकान चालवतात. सोमवारी (दि.16) गजानन महाजन कामानिमित्त जळगावला गेले असताना, तेजसला दुकानात बसवून ते रवाना झाले होते. त्यानंतर दुकान बंद करून तो घरी येईल, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. मात्र तेजस रात्रीपर्यंत घरी परतला नाही. त्याच दिवशी गावाचा बाजाराचा दिवस असल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला. अखेर कुटुंबीयांनी एरंडोल पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली होती. मंगळवारी (दि.17) सकाळी 8 वाजेच्या सुमारास खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतात एका मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता मृतदेह तेजस महाजन याचाच असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन बोलावून तपासाला सुरुवात केली आहे. हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी काही संशयितांची धरपकड करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून एरंडोल पोलिस पुढील करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.