प्रियकराच्या मदतीने पत्नीने डोक्यात दगड घालून पतीचा केला खून ; चाळीसगावात खळबळजनक

0

चाळीसगाव । चुलत दिराशी प्रेमसंबंध प्रस्थापित करणाऱ्या पत्नीने दिराच्या मदतीने पतीवर ब्लेडने वार करून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. खुनाचा हा प्रकार अपघात वाटावा या उद्देशाने अपघाताचा बनाव करणाऱ्या पत्नीला तिच्या प्रियकर दिरासह येथील पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

पोलिसांनी सांगितले, की कोदगाव (ता. चाळीसगाव) येथील तुषार देसले यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली, की रात्री पावणे अकरापूर्वी कुणाल बुंदेलखंडी यांच्या यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर बाळू सीताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी, ता. नादंगाव, जि. नाशिक) याला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

घटनास्थळी पोलिस गेल्यानंतर मयताच्या अंगावरील जखमांवरुन हा खुनाचा प्रकार असावा, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार, मयताच्या नातेवाइकांची विचारपूस केल्यावर मयताची पत्नी वंदना पवार हिच्यावर संशय बळावला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सुहास आव्हाड, संदीप घुले व कर्मचाऱ्यांना पाठवून वंदना पवार हिला येथील रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने खरी हकिगत सांगितली.
त्रासामुळे काढला काटा
वंदना पवार हिला तिचा पती बाळू पवार हा रोज दारू पिऊन शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्याच्या त्रासाला ती खूपच कंटाळली होती. या दरम्यान तिचा चुलत दिर गजानन राजेंद्र पवार (रा. न्यायडोंगरी, ता. नांदगांव, जि. नाशिक) याच्याशी तिचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध जुळले होते. आपल्या प्रेमसंबधाची माहिती पती बाळू पवार याला समजल्यावर तो अडथळा निर्माण करेल म्हणून वंदना पवार हिने दिर गजानन पवार याच्यासोबत पती बाळू पवारला जिवे ठार मारण्याचा चार- पाच महिन्यांपासून कट रचला होता.

त्यानुसार मंगळवारी (ता. १८) वंदना पवार व तिचा पती चाळीसगाव येथे येणार असल्याचे तिने दीर गजानन पवार याला अगोदरच सांगितले होते. ठरल्याप्रमाणे वंदना व गजानन यांनी गजाननच्या मोटारसायकलने मयत बाळू पवार याला हॉटेलमध्ये नेऊन जास्त प्रमाणात दारू पाजली. अंधार झाल्यावर वंदना हिने ‘मला माहेरी कन्नडला जायचे आहे’ असे सांगून दिर गजानन पवार याच्या मोटारसायकलवर मयत बाळू पवारला बसवून कोदगाव रस्त्याकडे नेले. दोघांनी बाळू पवारच्या पोटावर ब्लेडने वार करून, दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्याला जिवे ठार मारले.

अपघाताचा बनाव
खुनाच्या या घटनेचा कोणी संशय घेऊ नये म्हणून तसेच हा अपघात वाटावा या उद्देशाने दोघांनी बाळू पवारचा मृतदेह ओढत नेऊन महामार्गावर टाकून दिला. त्याचा ओळख पटावी म्हणून त्याचे आधारकार्ड त्याच्या शर्टाच्या खिशात टाकले व दोघे तेथून पसार झाले. पोलिसांनी मात्र, संशयित वंदना पवार व गजानन पवार यांना पळून जाण्याची संधी न देता, दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.