जळगाव शहरात २६ वर्षीय तरुणाची हत्या
जळगाव । जळगाव शहर तरुणाच्या खुनाच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. ६ ते ७ जणांच्या टोळक्याने तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करुन खून केल्याची घटना शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराशेजारी आज पहाटे घडली. विशाल ऊर्फ विकी रमेश मोची असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या तरुणाची सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता दिक्षीत वाडी शेजारील एमएसईबी कार्यालयाजवळ निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात ६ ते ७ जणांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून विशालला संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


विशाल मोची हा रामेश्वर कॉलनी येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ उदय आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे जळगावातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.