मोठी बातमी! रोहित आर्याचा एन्काऊंटर, मुंबई पोलिसांनी घातल्या गोळ्या
मुंबई । मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. यादरम्यान रोहित आर्यने पोलिसांवर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. उत्तरादाखल पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?


पवई येथील आरए स्टुडिओ दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शाळकरी मुले गेल्या ४-५ दिवसांपासून येथील स्टुडिओत प्रशिक्षणासाठी येत होती. ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना बोलावण्यात आले होते. ऑडिशनसाठी आलेल्या मुलांना दुपारच्या जेवणासाठी सोडल्यानंतर रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने त्यांना एका खोलीत बंद करून ओलीस ठेवले. ओलीस ठेवलेल्यांमध्ये १५ वर्षांखालील १७ मुले-मुली आणि दोन पालकांचा समावेश होता.
याबाबतची माहिती मिळताच स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्स (QAF) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. अखेर पवई पोलीस अधिकाऱ्यांनी बाथरूममधून खोलीत प्रवेश केला. आतमध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या मदतीने सर्व १९ जणांची (१७ मुले, १ प्रौढ, १ स्थानिक) सुखरूप सुटका करण्यात आली.
यावेळी पोलीस आणि रोहित आर्या यांच्यात चकमक झाली. याच चकमकीत रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत लगेच रुग्णालयात पाठवले. रुग्णालयातच रोहितचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलांची सुटका झाल्यानंतर त्यांना आणि पालकांना पवई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. मुले घाबरलेली असली तरी सुरक्षित आहेत, असे पालकांनी सांगितले.