मुक्ताईनगर मध्ये भीषण अपघात; डंपरने दुचाकीवरील तिघांना चिरडले
मुक्ताईनगर । मुक्ताईनगरमधून भीषण अपघाताची घटना समोर आलीय.यात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. तर आठ वर्षीय चिमुकली या अपघातात गंभीर जखमी झाली. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जमावाने आपला संताप व्यक्त करत डंपर पेटवून दिला आणि त्याच्या काचाही तोडल्या.
काय आहे घटना?


मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ आज २६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भरधाव एमएच 19 सीएक्स 2038 क्रमांकाच्या डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला उडविले. यात मोटारसायकलवरील दाम्पत्यासह एका मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त नागरिकांनी डंपरची तोडफोड केली. तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, मोटारसायकलवरील तिघांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. तर, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.