पुणे । अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, निलेश लंके गजा मारणेला का भेटले? या भेटीमागचं कारण काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
आता या भेटीमुळे निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत निवडून आल्यानंतर निलेश लंके सध्या पुणे दौरा करत आहेत. या दरम्यान ते वेगवेगळ्या लोकांना भेटत आहे. अशातच निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणेला भेटले आहेत. त्यांनी गजा मारणेकडून सत्कार देखील स्विकारला आहे. त्यांच्या या भेटीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. निलेश लंके आणि गजा मारणेच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गजा मारणे याच्यावर पुणे आणि परिसरातून विविध गुन्हे दाखल आहेत. खंडणी, खुनाचा प्रयत्न, मोक्का आणि अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमध्ये गजा मारणे आरोपी आहे. तो अनेक वर्ष तुरूंगात देखील होता. त्यामुळे त्याच्यावर नेहमी टीका होत असते. नुकतंच पोलीस आयुक्तांनी गुंडांची झाडाझडती घेतली होती, त्यामध्ये गजा मारणेचा देखील समावेश होता, अशा एका गुंडाची भेट घेतल्यामुळे निलेश लंके चर्चेत आले आहेत.