तीन आठवड्याची विश्रांतीनंतर मान्सूनचा प्रवास सुरु
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यानंतर पुढील प्रवास पुन्हा सुरू केला आहे. सोमवारी (ता. १६) मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा व्यापून विदर्भाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. पुढील दोन दिवसांत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यंदा मॉन्सून विक्रमी वेगाने आगमन करत २४ मे रोजी केरळसह कर्नाटक किनारपट्टीवर दाखल झाला. २५ मे मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धडक दिली. २६ मे रोजी मुंबईसह पुणे, धाराशिवपर्यंत मॉन्सून पोहोचला होता. तर २८ मे रोजी मॉन्सूनने पुढे चाल करत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या आणखी काही भागांसह विदर्भात प्रगती केली.
मुंबई, अहिल्यानगरसह बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागांपर्यंत मॉन्सूनने मजल मारली होती. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल थांबली होती.
त्यानंतर सोमवारी (ता. १६) मॉन्सूनने पुन्हा सक्रिय होत विदर्भाचा उत्तर भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा भावनगर, वडोदरा, खारगांव, अमरावती, दूर्ग, चांदबली, सांधेड बेटांपर्यंत होती.
वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, विदर्भाच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशाचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.