प्रतिक्षा संपली! ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा; कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा
मुंबई । राज्याच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आज पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत आज युतीची अधिकृत घोषणा केली.
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये राज- ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आहे. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र आल्या. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.


राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद होण्यापूर्वी त्यांनी दादरच्या शिवाजीपार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संपूर्ण ठाकरे कुटुंब यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यावेळी उपस्थित होत्या. ठाकरे बंधूंना आणि कुटुंबीयांना एकत्रित पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. ठाकरे बंधूं युतीची घोषणा करणार असल्यामुळे शिवसैनक आणि मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत आनंद व्यक्त केला.