गणिताला खेळाशी जोडणे हीच खरी शिक्षणाची दिशा- अथांग जैन

0

अनुभूती विद्या निकेतनमध्ये गणित प्रदर्शन २०२६ चे उद्घाटन

जळगाव । अनुभूती बाल निकेतन आणि अनुभूती विद्या निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ गणित प्रदर्शन–२०२६ चे आयोजन उत्साहात करण्यात आले. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये गणिताबद्दलची भीती दूर करून, गणित हा केवळ पाठांतराचा विषय नसून आनंददायी, सर्जनशील आणि दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय आहे, हे प्रत्यक्ष अनुभवातून दाखवून देणे हा होता.

गणित प्रदर्शनाचे उद्घाटन जैन फार्म फ्रेश फूडचे संचालक अथांग अनिल जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अंबिका जैन तसेच शाळेचे प्राचार्य मनोज परमार उपस्थित होते. उद्घाटनानंतर अथांग जैन यांनी अनेक स्टॉलला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या गणितीय मॉडेल्समधील नाविन्यपूर्ण विचार, संकल्पनांची स्पष्ट मांडणी, तर्कशुद्धता आणि सादरीकरणातील आत्मविश्वास पाहून त्यांनी विशेष कौतुक केले.

“विद्यार्थ्यांनी गणिताला खेळ, प्रयोग आणि अनुभवाशी जोडले आहे, हीच खरी शिक्षणाची दिशा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.या प्रदर्शनासाठी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन आणि संचालिका निशा अनिल जैन यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. आपल्या संदेशात अतुल जैन यांनी सांगितले की, “गणित हा केवळ गुण मिळवण्यासाठीचा विषय नसून, तो तार्किक, विश्लेषणात्मक आणि निर्णयक्षम विचारांचा पाया आहे. लहान वयातच जर विद्यार्थ्यांमध्ये ही दृष्टी विकसित झाली, तर भविष्यात ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.” प्राचार्य मनोज परमार यांनी या उपक्रमासाठी शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. प्रदर्शनादरम्यान शिक्षक किर्ती पगारिया, वर्षा मोहिते, स्वप्ना मोरे, हिमानी बारी आणि सोनिया शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.