माणिकराव कोकाटेंची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात
मुंबई । राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणामुळे अडचणीत सापडले असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद पुन्हा एकदा धोक्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यामुळे कोकाटे यांच्याविरोधात आज दिवसभरात अटक वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. कोकाटे यांनी या शिक्षेविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे.


काय आहे नेमकं प्रकरण ?
माणिकराव कोकाटे सध्या महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नाशिक जिल्ह्यातील आमदार आहेत. १९९५ मधील प्रकरणामुळे कोकाटे आणि त्यांचे बंधू अडचणीत आले आहेत. नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून गरीबांसाठी (अल्प उत्पन्न गट) सदनिका मिळवण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या भावाने बनावट कागदपत्रे दाखवली, असा आरोप आहे. त्यात त्यांनी आपले उत्पन्न कमी दाखवले आणि सदनिका बळकावल्याचाही आरोप आहे.
हे प्रकरण माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी उघड केले होते. मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तेव्हा माजीमंत्री दिघोळे यांची कन्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा दिली. त्यावर अपील केले होते, आता १६ डिसेंबर २०२५ रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आहे.