मोठी बातमी! मनसे- शिवसेना युतीची घोषणा उद्या
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून यातच मनसे- शिवसेना ठाकरे गटाची युतीची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. अशातच मनसे- शिवसेना युतीची घोषणा उद्या होणार आहे. ठाकरे बंधू उद्या युतीबाबबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असून उद्या मनसे- शिवसेना युतीची घोषणा होणार आहे. भव्य पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधू युतीबाबतची मोठी घोषणा करतील. वरळीतील एनएससीआय डोममध्ये यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ठाकरे बंधू या पत्रकार परिषदेमध्येच युतीबाबत मोठी घोषणा करतील असे सांगितले जात आहे.


मनसे आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा देखील आज सुटणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेतला जाईल. उद्या युतीच्या घोषणेवेळी कोण किती जागा लढवणार हे देखील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. युतीच्या घोषणेची उत्सुकता सर्वांना होती अखेर तो दिवस आला आहे.
२३ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी मनसे-शिवसेना युतीची घोषणा होईल. सर्व महानगरपालिकांबाबतची युतीची घोषणा उद्या होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते युतीच्या घोषणेची वाट पाहत होते. आता उद्या युतीची घोषणा करण्यात येणार असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.