43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या ; जळगाव मनपातील गंभीर प्रकार
जळगाव । जळगाव महापालिकेत तहसीलदारांच्या बनावट सह्या वापरून ४३ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे
अमरावतीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे बनावट लेटर हेड व बनावट सहीने जिल्हाधिकारी यांना पत्र दिल्याचा प्रकार कालच समोर आला होता. यानंतर आता जळगांवमध्ये तहसीलदारांच्या बनावट सहीने जन्म- मृत्यूचे दाखले दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यात जळगाव तहसीलदारांच्या सहीने तब्बल ४३ प्रकरणे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जळगाव महापालिकेच्या जन्म- मृत्यू नोंदणी विभागात फेब्रुवारी महिन्यात अवघ्या दहा ते बारा दिवसांत ५० प्रकरणे दाखल झाली होती. त्यातील ४३ प्रकरणांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता जळगावातील बोगस जन्मदाखल्यांच्या प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर जळगाव महापालिकेतील या गंभीर प्रकारामुळे महापालिकेचा मागील तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान जळगाव तहसीलदारांच्या नावाने बनावट सह्या करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होणार करण्यात येणार आहे. याप्रकरणी आता महापालिकेसह जळगाव तहसीलदार देखील गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणात मालेगाव प्रमाणे बांगलादेशी कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे या संपूर्ण दाखल्यांची कसून तपासणी प्रशासनातर्फे सुरू करण्यात आली आहे.