महायुती सरकारची ‘ही’ लोकप्रिय योजना होणार बंद? लाभार्थ्यांना झटका
मुंबई । महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु केलेल्या योजना आता एक-एक करुन बंद करण्याचा सपाटा लावला आहे. यातच आता महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
होय, महायुती सरकारची ‘आनंदाचा शिधा’ ही योजना देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना निधीअभावी बंद होण्याच्या मार्गावर असून, गणेशोत्सवानंतर आता दिवाळीतही शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार नाही, असे संकेत मिळत आहेत.
राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावे, यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केले जायचे. यामध्ये एक किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल यांचा समावेश होता.
तो लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत दिला जायचा. 2023 मध्ये गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने, तसेच 2024 मध्ये अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सरकारने ‘आनंदाचा शिधा’ किटचे वितरण केले होते. मात्र, यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजनाही बंद होणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.