महायुती सरकारच्या शपथविधीची तारीख समोर

0

मुंबई । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून सत्तास्थापनेला वेग आला आहे. मात्र अद्यापही महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालं नसून अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आहे. या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीखही समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अखेर ठरला आहे. देवेंद्र फडणवीस ५ डिंसेबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील वेगवेगळ्या मैदानाची चाचपणी महायुतीकडून सुरु होती. शिवाजी पार्कवर ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी शिवाजी पार्कवर येतात. त्यांच्यासाठी विशेष सोय शासनाकडून करण्यात आली आहे. तर आझाद मैदानावरही एका कार्यक्रमाचं आयोजन २ डिसेंबर रोजी आहे. मात्र, आझाद मैदानावरील हा कार्यक्रम ५ डिसेंबर आधी समाप्त होणार आहे. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनेक राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधीला येण्याची शक्यता आहे. अनेक सेलिब्रिटी देखील येणार आहे. तसेच काही महंत देखील हजेरी लावणार आहे. या सर्वांचा विचार करून आझाद मैदानाची निवड केल्याची माहिती मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.