महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित
महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. सूत्रांनुसार, संख्याबळाच्या निकषावर भारतीय जनता पक्ष (भाजप), शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळांचे वाटप होणार आहे. यात भाजपला सर्वाधिक 44, शिंदे गटाला 33, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 23 महामंडळे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सिडको आणि म्हाडा या दोन महत्त्वाच्या महामंडळांवरून भाजप आणि शिंदे गटात तीव्र रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्ष या महामंडळांवर दावा सांगत असून, याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आपल्या नाराज आमदार आणि नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. या जागावाटपातून पक्षांतर्गत नाराजी कमी करून एकजुटीचं प्रदर्शन करण्याचा महायुतीचा मानस आहे. याशिवाय, महामंडळांच्या नियुक्त्या आणि अधिकारपदांवरूनही चर्चा तापली आहे. या फॉर्म्युल्यामुळे महायुतीच्या अंतर्गत समन्वय आणि राजकीय रणनीतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आता याची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

