उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद; काय सुरु काय बंद राहणार?
बदलापूरमध्ये दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारा विरोधात राज्यात आक्रोश सुरु आहे. राज्यभरातील जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. आता विरोधकाही एकटवले आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. या महाराष्ट्र बंदला अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या महाराष्ट्र बंदच्या दिवशी नेमकं काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. महाराष्ट्र बंदच्या दिवशी शाळा, कॉलेज, बँका सुरू राहणार आहेत की नाही हे आज आपण जाणून घेणार आहोत….
विरोधी पक्षाने बंदची हात दिली असली तर महाराष्ट्र सरकारने या बंदला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे लोकल, बस आणि मेट्रो नेहमीप्रमाणे सुरू राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र बंदच्या दिवशी सरकारी कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू राहतील. शनिवारी सुट्टी असणारे कार्यलय बंद राहतील. २४ ऑगस्टला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरामध्ये बँका बंद राहतील. आरबीआयच्या नियमांनुसार, बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी, रविवारी, राष्ट्रीय सुट्ट्या आणि प्रादेशिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात.
महाराष्ट्र बंद विकृतीविरोधात संस्कृती असा असणार आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी उद्या दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळवा. जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे., असे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहिल. महाराष्ट्र बंदच्या दिवशी रुग्णवाहिका सुरू राहतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीमध्ये आहे. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले.