29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; 15 जानेवारीला मतदान
मुंबई । राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी (दि. 15 डिसेंबर) मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार 15 जानेवारी 2026 रोजी निवडणूकीसाठी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. मतदार यादीत दुबार नावे असणाऱ्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल. या मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येईल. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन पाहणी केली जाईल. मुंबईत 10, 111 मतदान केंद्र असतील, असे ते म्हणाले.


29 महापालिकांत 2869 जागा –
आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह 29 महापालिकांतील 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात 1442 महिला उमेदवार आहेत. त्यात अनुसूचित जातीच्या 341, एसटीच्या 77 व नागरिकांचा मागास प्रवर्गातील 759 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणूक खर्चाची मर्यादा –
महापालिका निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने आखून दिली आहे. त्यामध्ये मुंबईसह अ वर्ग महापालिकांसाठी एका उमेदवाराला 15 लाख रुपये खर्च करण्याची मुभा आहे. अ वर्ग – 15 लाख, ब वर्ग – 13 लाख, क वर्ग – 11 लाख, ड वर्ग – 9 लाख.
मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र नाही त्यांना निवडणुकीपासून सहा महिन्यांच्या आत सादर करावं लागणार आहे. मतदार जनजागृतीसाठी रील तयार करण्यात आले आहेत. जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मतदार केंद्रावर आवश्यक त्या सुविधा असतील. मतदान केंद्रावर रँप आणि व्हील चेअर असतील.
राज्यातील 1,96, 605 कर्मचारी या निवडणुकीसाठी काम करतील. मतदानाच्या आधी 48 तास प्रचारावर बंदी असेल. तसेच त्या दरम्यान जाहिरातींवरही बंदी असेल. महापालिका निवडणूक नियमांनुसार ही बंदी असेल. राज्यातील 29 महापालिकांसाठी एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामध्ये 1,442 महिला सदस्य, 759 इतर मागासवर्गीय सदस्य, 341 अनुसूचित जाती तर 77 सदस्य हे अनुसूचित जमातीचे सदस्य असतील.
मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल.
महत्वाच्या तारखा –
-नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी, 23 ते 30 डिसेंबर 2025
-छाननी – 31 डिसेंबर 2025,
-उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी 2026
-निवडणूक चिन्हा वाटप व अंतिम उमेदवाराची यादी 3 जानेवारी 2026
-मदतानाचा दिनांक 15 जानेवारी 2026
-मतमोजणी दिनांक – 16 जानेवारी 2026