नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

0

मुंबई | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज (सोमवारी) 10 वाजता थांबणार आहे. राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार गट आणि शिंदेसेना असा सामना पहायला मिळत आहे. यासाठी फडणवीसांसह अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला.

दुसरीकडे काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव सेना या विरोधी पक्षांचा प्रचार सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या प्रचारासमोर फिका पडल्याचे दिसले. रविवारी सर्वच पक्षातील प्रमुख नेते राज्यभर प्रचाराच्या दौऱ्यावर होते, तर सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे अनेक पक्षांनी अंतिम शक्तिप्रदर्शनासाठी सभा, जनसंपर्क आणि रोड शो आयोजित केले आहेत.

मतदानाची वेळ
मंगळवारी २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती असलेली आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलिसांकडून कडक सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.

या वेळेनंतर काय बंद राहणार?
रात्री १० वाजल्यापासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर, निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी / प्रसारण या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध असतील. यापूर्वी ४ नोव्हेंबर २०२५ च्या एकत्रित आदेशात मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद होईल, अशी तरतूद होती.

Leave A Reply

Your email address will not be published.