लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही? ही वस्तुस्थिती….; संजय शिरसाट यांचं मोठं विधान
मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत ही योजना गेमचेंजर ठरली आणि महायुती सरकार भरघोस मतांनी पुन्हा निवडून आले. विधानसभेचा निकाल लागून आणि सरकार स्थापन होऊन आता ३ ते ४ महिने होत आले आहेत.
मात्र, लाडक्या बहिणींना दरमहिना २१०० रुपये मिळाले नाहीत. ते पैसे कधी मिळणार असा सवाल लाभार्थी महिलांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वच जण विचारत आहेत. त्यातच, सरकारमधील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता असं म्हटलं होतं. तर, आता मंत्री संजय शिरसाट यांनीही स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, लाडक्या बहिणींना 1500 चे 2100 देता येणार नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले, राज्याच बजेट अडीच लाख कोटी रुपयांच आहे. सामाजिक न्याय विभागाला साडे एकोणतीशे कोटी मिळायला हवेत. पण मला 22 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. लाडक्या बहिणींसाठी 3 हजार कोटी विविध योजनेसाठी 7 हजार कोटी दिले आहेत. मला केवळ 15 हजार कोटी रुपये मिळाले, त्यातील 7 हजार कोटी दुसऱ्या योजनेला गेले आहेत. त्यामुळे, मला 3 हजार कोटी रुपये देणे आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मी लेखी पत्र दिलं आहे, अजित पवार यांना देखील विनंती केली आहे. 11.8 टक्के रक्कम मला म्हणजेच माझ्या खात्याला देणं गरजेचे आहे, असं, म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
तसेच, लाडक्या बहीण बाबत मला फेब्रुवारीमध्ये फाईल आली होती. त्यावेळी मी स्पष्टपणे पैसे देता येणार नाही, असं लिहिलं होतं. लाडक्या बहीण योजनेचे सरकारवर बर्डन आहे. अजित पवार जाणीवपूर्वक करत असतील असं मला वाटत नाही. त्यांना गाईड करणारे सेक्रेटरी चुकीच ब्रीफ करत असणार, असं म्हणत संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली.