लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी ठरली डोकेदुखी! मंत्र्यांची जाहीर कबुली

0

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारसाठी ‘गेमचेंजर’ ठरलेली ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या योजनेमुळे सत्ता मिळाली असली, तरी आता तीच योजना सरकारसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी मिळण्यास विलंब होत असल्याची जाहीर कबुली दिली आहे, ज्यामुळे या योजनेबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनीही या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

विकास निधी वेळेवर मिळत नाही
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यक्रमात बोलताना लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य केलं. इंदापूर तालुक्याला सर्वाधिक विकास निधी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करत असतो, पण लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास विलंब होतो. आता मंत्री भरणे यांच्या या वक्तव्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, की, यात लपवण्यासारखे काहीच नाही. लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावर आपले मत मांडताना छगन भुजबळ म्हणाले, 100 टक्के मलाही वाटतं आणि कोणालाही वाटणे हे साहाजिकच आहे. लाडक्या बहिणीसाठी सरकारकडे शिल्लक निधी नव्हता. जोपर्यंत नीट घडी बसत नाही, तोपर्यंत हा ताण सहन करावा लागणार आहे. पूर्ववत घडी कशी बसणार यासाठी प्रयत्न करत असल्याचेही भुजबळ यांनी सांगितलं.लाडकी बहीण योजना, शिवभोजन थाळी याचे देखील पैशांना उशीर होत आहे. पैसे कुठेही जाणार नाहीत, सर्वांना ते पैसे मिळणार. कशाला प्राधान्य द्यायचे हे सरकारने ठरवायचे असते, असेही भुजबळ यांनी सांगितलं.

लाडक्या बहीणींसाठी पैसे, लाडक्या भावांचं काय?
लाडक्या बहिणाबाईंना पैसे मिळत आहेत, मात्र लाडक्या भावांचे अनुदान अद्याप मिळाले नाही. त्यांना पण पैसे मिळतील. एखाद्या मोठ्या घरात खर्च वाढतो, त्यावेळी नेहमीचे खर्च मागे-पुढे आपण करतो, सगळ्यांना पैसे मिळणार. शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाच्या घरातच जातात ना, लाडक्या बहिणी थोडी सगळे पैसे खर्च करत असतात. लाडक्या बहिणीचा भार सरकारी तिजोरीवर पडला हे खरं आहे, त्यात लपवण्यासारखे काय? असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.