लाडकी बहीण योजना पडली महागात, राज्याच्या तिजोरीवर ताण; एका वर्षात किती कोटी झाले खर्च?
मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. यातच आता या एका योजनेसाठी सरकारचा किती पैसा खर्च होतो, याबाबत एक आकडेवारी समोर आली आहे. . सरकारने मागच्या वर्षभरात या योजनेसाठी ४३ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. आरटीआयमध्ये याबाबत माहिती उघड झाली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै 2024 ते जून 2025 पर्यंत 43,045.06 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकार अर्जात म्हटले आहे. एप्रिल २०२५ मध्ये योजनेचे सर्वाधिक २.४७ कोटी लाभार्थी होते, मात्र जून २०२५ पर्यंत ही संख्या सुमारे ९ टक्क्यांनी घटली.


निकषांच्या आधारे सुमारे अडीच लाख महिलांना वगळल्याने सरकारची ३४० कोटी रुपयांची बचत झाली. मात्र असे असले तरी, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मंजूर असलेला ३६,००० कोटी रुपयांचा निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी न केल्यास सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात सर्वाधिक महिला लाभार्थी होत्या. २.४७ लाख महिलांना १५०० रुपये देण्यात आहे. जून महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या कमी झाली. पडताळणीमधून ७७,९८० महिला बाद करण्यात आल्या त्यामुळे सरकारची ३४०.४२ कोटींची बचत झाली. मात्र योजनेच्या सुरुवातीला सरकारने 36,000 कोटींचा निधी दिला होता. पण, एक वर्षानंतर योजनेवरील खर्चाचा एकूण आकडा समोर आल्यानंतर हा खर्च वाटप केलेल्या निधीपेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक ताण सरकारी तिजोरीवर येत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडून ही योजना बंद होणार नसल्याचे आश्वासन देखील महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार दिले जात आहे