लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात पैसै जमा होण्यास सुरूवात..
मुंबई । लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू करण्यात आले असून लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून ही माहिती दिली.
ट्वीटमध्ये आदिती तटकरे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यावर १५०० रुपये जमा केले जातात. महिला व बाल विकास विभागाकडून ही योजना चालवली जाते. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे २३ फेब्रुवारीला देण्यात आले होते. त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष फेब्रुवारीचा हफ्ता कधी येणार याकडे लागले होते. अखेर आजपासून या हप्त्याचे १५०० रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.