पाचोऱ्यात महसूल अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातून लाचखोरीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामधील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला १५ हजार रूपयांची लाच भोवली आहे. लाच स्वीकारताना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
नेमका प्रकार काय?
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे कोकडी (ता. पाचोरा) शिवारात पोट खराब क्षेत्र असून ते त्यांनी मेहनत वहितीखाली आणले आहे. त्यावर पीक लागवड करत आहे. मात्र, सदरचे क्षेत्र हे गाव नमुना नंबर ७ / १२ मध्ये पोट खराब म्हणून दाखल असल्याने त्यांना नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई आणि शेती विषयक कर्ज मिळत नाही. म्हणून क्षेत्र गाव नमुना नंबर ७ / १२ वर वहीतीखाली लावणेकामी तक्रारदार यांची पत्नी यांचे नावे ४ सप्टेंबर २०२५ रोजी पाचोरा उप विभागीय कार्यालयात अर्ज करुन अर्जात नमुद केलेले काम करुन देण्यासाठी सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांची भेट घेतली.
तेव्हा त्यांनी काम करुन देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एकूण १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांची इच्छा नसताना त्यांनी गणेश लोखंडे यांना ५ हजार रुपये रोख दिले होते व बाकी १० हजार रुपये दिल्यावर तुमचे काम करुन देईल, असे लोखंडे यांनी सांगितले होते.
परंतु तक्रारदार यांना त्यांचे मागणीप्रमाणे बाकी असलेले १० हजार रुपये लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ९ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांचेकडे तक्रार दिली होती. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी केली असता गणेश लोखंडे यांनी यापूर्वी ५ हजार स्विकारल्याचे कबुल केले. त्याप्रमाणे १० सप्टेंबर रोजी सापळा रचून १५ हजार रूपये लाचेच्या रकमेपैकी दुसरा हफ्ता १० हजार रुपये लाचेची रक्कम लोखंडे यांना घेताना रंगेहाथ अटक केली.