चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग अमळनेरचे उपविभागीय अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील (वर्ग-१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत करण्यात आलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाच्या बिलासाठी दिलीप पाटील लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार हा खाजगी ठेकेदार असून त्याने चोपडा तालुक्यातील मौजे व मांजरे हिंगोणे या ठिकाणी एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण केले होते. काम पूर्ण झाल्यानंतर बिलाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ठेकेदार अमळनेर येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कार्यालयात गेला असता, उपविभागीय अधिकारी पाटील यांनी अहवाल तयार करून देण्यासाठी दोन टक्के म्हणजेच ७ हजार रुपयांची लाच मागणी केली.
तक्रारदाराने ही बाब जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली. पडताळणीदरम्यान मागणी खरी आढळल्याने एसीबीने सापळा रचला. तडजोडीनंतर ४ हजार रुपयांवर व्यवहार ठरला, आणि आज (१५ ऑक्टोबर) अधिकारी पाटील यांनी ही लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील, रेश्मावतारे, नरेंद्र पाटील, हेमंतकुमार महाले (नंदुरबार) आणि राकेश दुसाने (जळगाव) यांच्या पथकाने केली.