लाच भोवली ! अमळनेरच्या दोन पोलिसांसह पंटरला रंगेहात पकडले

0

अमळनेर । काँप्रेसरने गॅस भरण्याचा व्यवसाय करू देण्यासाठी १५ हजाराची लाच मागून तडजोडीअंती १२,००० रुपये स्वीकारताना अमळनेर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कॉन्स्टेबलसह त्यांच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईने जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संबंधीत तक्रारदार हा अमळनेर येथील रहिवासी असून तो धुळे रोडवर काँप्रेसरच्या मदतीने गॅस भरण्याचा व्यवसाय करतो. दरम्यान, अमळनेर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल राजेंद्र पाटील आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे यांनी त्या व्यावसायिकाची भेट घेऊन त्याला दरमहा पंधरा हजार रूपयांचा हप्ता द्यावा, अशी मागणी केली. त्याने हप्ता न दिल्यास त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील त्यांनी दिली. तडजोड करून त्यांनी बारा हजार रूपये दरमहा देण्याचे सांगितले. यातील पहिला हप्ता देण्याचे या दोघांनी त्या व्यावसायिकाला नमूद केले.

दरम्यान, संबंधीत व्यक्तीने या प्रकरणी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पथक तयार करून सापळा रचला. या पथकाने सापळा लाऊन अमोल राजेंद्र पाटील आणि जितेंद्र रमणलाल निकुंभे या दोघांना बारा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई पाचपावली मंदिराजवळच्या एका पान टपरीवर करण्यात आली.

या प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात कार्यरत असणारे कर्मचारी अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे यांच्यासह त्यांचा पंटर उमेश भटू बारी या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.