मुख्याध्यापिकेसह कनिष्ठ लिपिकाला लाच स्वीकारताना अटक
जळगाव । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच महिला उपशिक्षिकेची प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी ३६ हजारांची लाच स्वीकारताना रावेर खिरोदा येथील मुख्याध्यापिके सह कनिष्ठ लिपिकाला धुळे एसीबीने अटक केली. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जनता शिक्षण मंडळ संचालित खिरोद्यातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पीतांबर महाजन (वय ५७, रा. चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७, रा. उदळी, ता. रावेर) यांना धुळे एसीबीने लाच स्वीकारताना अटक केली आहे. ७ जुलैला सायंकाळी झालेल्या या कारवाईने शैक्षणिक वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील ६१ वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून निवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या खुषा या ही याच शाळेत उपशिक्षिका आहेत.
प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी २ जूनला मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला होता. तर तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना ५ हजार याप्रमाणे ६ महिन्यांसाठी ३० हजार रुपये मागितले होते. दरम्यान, ७ रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी केली असता लाचेची रक्कम एकूण ६ महिन्यांसाठी ३६ हजार रुपये मागण्यात आली. त्यानंतर कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली. हा सापळा धुळे एसबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आला. या दोघांविरोधात सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.