केळी-उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम; निर्यातक्षम केळी लागवडीसाठी शेतकऱ्यांना दिली नवी दिशा
जळगाव । जळगावात “केळी – उत्तम कृषी पद्धतीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम” जिल्हा नियोजन भवन, जळगाव येथे उत्साही वातावरणात पार पडला. सहकार व पणन विभाग तसेच आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ग्रीन बिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन कृषी व आत्मा विभाग, जळगाव आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, कृषी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कृषीविषयक आवड असणारे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केळी लागवडीच्या निर्यातक्षम तंत्रज्ञानाबाबत, उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता नियंत्रण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, आंतरराष्ट्रीय मानके, निर्यातीच्या संधी, वित्तीय व्यवस्थापन आणि सामाजिक समावेशन यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ आणि अधिकारी उपस्थित होते. यामध्ये विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, उपसंचालक शिवपुरी पुरी (PIU MAGNET, नाशिक), केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण भोसले, जैन इरिगेशनचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. के. बी. पाटील, एक्सिम फार्मर इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीण वानखडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही. टी. गुजर, मॅग्नेटचे GESI अधिकारी धनराज देशेटवार, अॅग्री बिझनेस तज्ज्ञ सनी काटे आणि MG & FIL चे महेश वसईकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि प्रकल्प संचालक आत्मा, जळगाव कुरबान तडवी यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना आधुनिक व वैज्ञानिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळाली. विशेषतः केळी उत्पादन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी ओळखून त्याचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागते, याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले.
संपूर्ण कार्यक्रम शेतकरी केंद्रित होता. शेतकऱ्यांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा, त्यांच्यामध्ये उद्योजकता आणि जागतिक दृष्टिकोन निर्माण करणारा होता तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी मार्गदर्शन, संशोधन, निर्यात, बाजारपेठेतील संधी, तसेच डिजिटल वित्तीय व्यवस्थापन यावर भर देणारा उपक्रम शेतीच्या मूल्यसाखळीला चालना देणारा ठरला.