शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सहकार मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; राजकीय वातावरण तापणार
जळगाव । एकीकडे अतिवृष्टी आणि महापूराने राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. त्यातच सरकार देत असलेली मदत ही तुटपूंजी असल्याची ओरड होत आहे. अनेक ठिकाणी अजून पंचनामे झाले नाहीत. या सर्वांचा मनस्ताप आणि सरकारविरोधात संताप असतानाच सहकार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानाने त्यात भर घातली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
चोपडा येथे दीपज बँकेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमात बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय. एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनिल भाईदाससारखा माणूस गेला , लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार.


त्याने काय मागावं ठरवावं ना.. अनिल भाईदास म्हणाले, नदीही देऊन टाकू.. म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं.. निवडणुकी आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा, असे बाबासाहेब पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावरून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाची भावना दुखावली असून, विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पाटील हे ग्रामीण भागातून निवडून येणारे नेते आहेत. लातूरसारख्या दुष्काळी भागातून ते येतात. तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहित आहे. बाबासाहेब पाटील यांच्यासारख्या मंत्री ज्यांच्याकडे सहकार खाते आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असे बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे. मुळात शेतकरी कर्जबाजारी का झाला तर सरकारच्या धोरणामुळे झाला. शेतकऱ्याची चेष्टा करण्याच्या ऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी. केंद्र सरकारचे धोरण कुठे चुकले आहे? एक जबाबदार मंत्री म्हणून त्यांनी केंद्रामध्ये जाऊन बसावे आणि तुमच्या धोरणामुळे आमचा शेतकरी कर्जबाजारी होत आहे, असे सांगावे. परंतु, ते शेतकऱ्यांची थट्टा करत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी टीका त्यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावर केलीय.