कडगावात विकासाचा त्रिवेणी संगम; विविध विकासकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
जळगाव | कडगाव (ता. जळगाव) येथे ४२ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यामध्ये सामाजिक सभागृह, आधुनिक व्यायामशाळा व मरीमाता मंदिर परिसरातील सभामंडपाचा समावेश आहे.
या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, “ही व्यायामशाळा म्हणजे केवळ दंड-बैठका टाकण्याची जागा नसून नव्या पिढीच्या घडणीसाठीची प्रयोगशाळा आहे. सामाजिक सभागृह गावाच्या एकतेचे प्रतीक आहे, तर मरीमाता मंदिरातील सभामंडप श्रद्धा आणि संस्कृती यांची सांगड घालतो.” गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कडगाव धनगर वाड्यातील १५ लाख रुपये खर्चाचे सामाजिक सभागृह, १५ लाखांच्या निधीतून साहित्यासह उभारलेली व्यायामशाळा व १२ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला मरीमाता मंदिर परिसरातील सभामंडप अशा एकूण ४२ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचे आज श्रावण सोमवारच्या दिवशी लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच मिलिंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ते तुषार महाजन, योगेश कोळी, सरपंच सौ. अलकाबाई कोळी, उपसरपंच प्रवीण कोळी, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, सचिन पाटील, दीपक कोळी, किरण धनगर, नवल कोळी, नंदू कोळी, नरेंद्र सपकाळे, मधुकर धनगर, सागर कोळी, संदीप कोळी, भूषण पाटील तसेच ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण धनगर यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश कोळी यांनी मानले.