टेंशन वाढलं! जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये शिरकाव, पहिला रुग्ण आढळला

0

मुंबई | पुणेकरांची चिंता वाढवलेल्या जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत मुंबईत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते. या व्यक्तीवर सध्या महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी ५० विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील मुरजी पटेल यांनी केल्या आहेत.

दरम्यान, पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात रुग्णांचा आकडा १७३ वर पोहचला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात १७० संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. २१ रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या आजारामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जीबीएस आजाराची लक्षणं –
– अचानक पायातील किंवा हातात येणारी कजोरी अथवा लकवा
– अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील भास किंवा कमजोरी
– डायरिया

नागरीकांनी कशी घ्यावी काळजी –
– पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
– पाणी उकळून पिणे.
– अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
– वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
– शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खावू नये.
– नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.

Leave A Reply

Your email address will not be published.