जामनेर तालुक्यात बैलांना धुण्यासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

0

जामनेर । ऐन पोळाच्या दिवशी जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. बैलांना नदीवर अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सुशील सुनील इंगळे (वय २२, देवळसगाव, ता. जामनेर) असे घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज पोळा सण असल्याने सुशील आपल्या बैलांना आंघोळ घालण्यासाठी २१ ऑगस्टला सकाळी साडेअकराच्या सुमारास सूर नदीकाठी गेला होता. दरम्यान पाऊस झाल्याने नदीला मोठा पूर आला होता. सुशील बैलांना घेऊन नदी काठी गेला असताना बैलांना अंघोळ घालत होता. यावेळी नदीचा प्रवाह आणि पाणी जास्त असल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला. काही कळायच्या आतच पाण्याच्या लाटांमध्ये तो बुडाला.

सदरची घटना आजूबाजूला असलेल्या लोकांना समजताच त्यांनी सुशीलला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढे ग्रामस्थांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही. काही क्षणातच नदीपात्रात बुडालेला सुशील दिसेनासा झाला. या घटनेमुळे इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बैलपोळा सणाच्या उत्साहावर पाणी फिरविणाऱ्या या घटनेने संपूर्ण गाव शोकमग्न झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.